जेव्हा ध्येयाचे वेड मनात घट्ट होते तेव्हा कितीही विपरीत परिस्थिती आली तरीही बऱ्याच व्यक्ती त्या रस्त्यावरून मागे न फिरता मोठ्या चिकाटीने आणि परिस्थितीवर मात करीत त्या ध्येयापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील शेतकरी दाम्पत्याच्या कन्येने एमपीएससी सारख्या परीक्षांमध्ये घवघवीत यश संपादन केले आहे.
ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षण घेऊन वंदना व निंबा पवार या शेतकरी दाम्पत्याची कन्या हर्षाली पवार स्पर्धा परिक्षेतून अधिकारी बनली आहे. सौंदाणे (ता. मालेगाव) येथील हर्षालीने राज्य उत्पादन शुल्क विभागात दुय्यम निरीक्षक पदाला गवसणी घातल्याने तिचे कौतुक होत आहे.
हर्षाली पवार हिच्या शिक्षणाचा विचार केला तर गावातील मराठी शाळेत प्राथमिक शिक्षण व नंतर जनता विद्यालय या ठिकाणी माध्यमिक व केबीएच कनिष्ठ महाविद्यालयात बारावी पर्यंतचे शिक्षण घेतले व त्या उत्तीर्ण झाल्या. बारावीपर्यंत शिक्षण घेत असताना ज्या दिवशी सुट्टी असेल त्या दिवशी आई-वडिलांना शेतीमध्ये मदत करण्याचे देखील काम त्यांनी केले.
परंतु हर्षाली यांचे आई-वडील हे शेतकरी होते परंतु त्यांच्या लेकीने खूप शिकावी अशी त्यांची इच्छा असल्यामुळे हर्षाली यांनी शिक्षण पूर्ण करत जळगाव येथील कृषी महाविद्यालयात बीएससी ऍग्री पदवी संपादन केली व त्यानंतर स्पर्धा परीक्षेत यश मिळवायचे व अधिकारी होण्याची जबरदस्त इच्छा त्यांनी मनाशी बांधली.
आहे त्या परिस्थितीत रस्ता काढत अभ्यास सुरू ठेवला व नियोजनपूर्वक या परीक्षेची तयारी केली. परंतु मध्यंतरी कोरोना कालावधीमध्ये सगळ्या परीक्षा या रद्द झाल्या.परंतु या बिकट परिस्थितीला देखील त्यांनी संधी म्हणून पाहिले व परीक्षांची तयारी जोरात चालू ठेवली. या कालावधीमध्ये त्यांना आई-वडिलांसोबतच मित्र-मैत्रिणींचे भावनिक व मानसिक पाठबळ मिळून त्यांना भक्कम आधार मिळाला असे देखील हर्षाली यांनी सांगितले. या सगळ्या जोरावर त्यांनी नियोजनपूर्वक व खडतर अभ्यास केला व राज्य उत्पादन शुल्क विभागांमध्ये दुय्यम निरीक्षक या पदावर झेप घेतली.”