बस स्टॅंडवर पाणी विकणाऱ्या तरुणाने मिळविले MPSC परीक्षेत यश

सरकारी अधिकारी होण्याची इच्छा प्रत्येक तरुण उराशी बाळगून राहतो. मात्र यात काहींनाच यश मिळते तर काहींच्या पदरी निराशा पडते. मात्र मनात जिद्द आणि चिकाटी असेल तरच जीवनात कोणतेही यश तुम्ही मिळवू शकता.याचे एक उदाहरण बस स्टॅंडवर पाणी विकणाऱ्या तरुणाने MPSC परीक्षेत यश मिळविले.

अभिजीत अनिल नरळे या तरुणाने सहायक मोटार वाहन निरीक्षक आणि ज्युनिअर अभियंता अशा दोन महत्वाच्या पदाला गवसणी घातली आहे. सोलापूरच्या आवसे वस्ती आमराई या झोपडपट्टी भागात अभिजित राहतो. त्याने मिळवलेल्या दोन पदांपैकी सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक या पदाला त्याने पसंती दिली आहे.

अभिजित याचा जन्म 25 सप्टेंबर 1996 रोजी आवसे वस्ती या झोपडपट्टी भागात झाला आहे. वडील अनिल नरळे हे नरसिंग गिरजी मिलमध्ये काम करत होते. आई गृहिणी आहे. गिरणी बंद पडल्यानंतर वडिलांनी सोलापूर बसस्थानकावर पाणी बाटली विक्रीचा व्यवसाय सुरू केला. अभिजीतसुद्धा त्यांना या कामात मदत करायचा. तर आईने बी. एस. सी. पर्यंत शिक्षण असूनही कपडे आणि बांगड्या विकून अभिजितसह सर्व मुलाबाळांना शिक्षित केले. अभिजितला एक मोठा भाऊ तर दोन बहिणी आहेत. एक बहीण M.Tech झाली आहे तर दुसरी पुण्यात बँकेत नोकरी करते. अभिजितचे पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण आमराई येथील महात्मा बसवेश्वर प्रशालेत झाले तर आठवी ते बारावीपर्यंतचे शिक्षण नॉर्थकोट प्रशालेत झाले आहे. घरच्या बिकट आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण घेण्यात अडथळे येत होते पण या खडतर वाटचालीतही अभिजीतच्या आई – वडिलांनी मुलांचे शिक्षण थांबू दिले नाही.

अभिजीत  वडिलांना व्यवसायात मदत करत आणि मिळेल त्या वेळेत अभ्यास करत त्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी परीक्षा दिली. 2021 मध्ये पुण्यात मुख्य परीक्षा झाली. 22 मार्च 2022 रोजी या परीक्षेचा निकाल लागला. आणि अभिजित 300 पैकी 247 गुण मिळवून सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक म्हणून महाराष्ट्रातून 10 वा तर सोलापूर जिल्ह्यातून पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला.

स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये ही मारली बाजी
इतकेच नव्हे तर अभिजीतने लोकसेवा आयोगाची परीक्षा देत असतानाच मार्च 2020 मध्ये त्याने केंद्र सरकारच्या स्टाफ सिलेक्शन कमिशनची परीक्षा दिली. याचा निकालही 26 फेब्रुवारी 2022 रोजी जाहीर झाला. (MPSC Success Story) या परिक्षेतही अभिजीत ज्युनिअर इंजिनिअर म्हणून उत्तीर्ण झाला. केवळ एक महिन्याच्या अंतराने अभिजीतने चक्क दोन महत्त्वाच्या पदांना गवसणी घातल्यानंतर कुटुंबातील सदस्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. “आई वडिलांनी आपल्यासाठी घेतलेले अपार कष्ट आपल्याला यशस्वी करू शकले,” अशी प्रतिक्रिया अभिजीतने दिली. अभिजितवर त्याने मिळवलेल्या यशाबद्दल परिसरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,925FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles