मानवयुक्त चांद्र मोहिम भारत 2040 भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो (ISRO) ने गेल्या काही दशकांमध्ये प्रक्षेपण वाहनांच्या बाबतीत मोठी झेप घेतली आहे. आज ते जगातील काही निवडक अवकाशशक्तींमध्ये उभे आहे.
नवीन पाऊल – LMLV
इस्रो सध्या आपल्या सर्वात जड रॉकेटवर काम करत आहे – लूनर मॉड्यूल लाँच व्हेईकल (LMLV). हे रॉकेट 2035 पर्यंत तयार होईल आणि 2040 साली भारताच्या पहिल्या मानवयुक्त चांद्र मोहिमेत वापरले जाणार आहे. या रॉकेटची क्षमता प्रचंड आहे – ते पृथ्वीच्या खालच्या कक्षेत (LEO) तब्बल 80 टन वजन नेऊ शकते आणि चंद्रावर थेट 27 टन पेलोड पाठवू शकते.
सुरुवातीचे प्रयत्न
भारताचे पहिले रॉकेट प्रक्षेपण 1963 मध्ये झाले. केवळ नारळाच्या झाडांनी वेढलेल्या थुंबा प्रक्षेपण केंद्रातून अमेरिकन नाईक अपाचे हे साउंडिंग रॉकेट उडवले गेले. ही सुरुवात होती, परंतु या रॉकेट्सनी फक्त वातावरणाच्या वरच्या थरापर्यंत उड्डाण केले – कक्षेत जाण्याची क्षमता नव्हती.
नंतर डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वाखाली भारताने स्वतःचे रॉकेट बनवले – SLV-3. 1979 मधील पहिले प्रक्षेपण अपयशी ठरले, परंतु 1980 मध्ये रोहिणी-1 उपग्रह यशस्वीरित्या कक्षेत गेला. या यशामुळे भारत जगातील सहावा देश ठरला ज्याने स्वतःचा उपग्रह स्वतःच्या रॉकेटने अंतराळात पोहोचवला.
रॉकेट्सची प्रगती
ASLV : SLV-3 ची मर्यादा लक्षात घेऊन विकसित. स्ट्रॅप-ऑन बूस्टर्समुळे अधिक वजन उचलू शकले. सुरुवातीला अपयश आले पण यामुळे पुढील प्रगतीचा पाया रचला.
PSLV (1994) : इस्रोचे सर्वात यशस्वी आणि विश्वासार्ह रॉकेट. याने भारताला आंतरराष्ट्रीय बाजारात उपग्रह प्रक्षेपणासाठी ओळख मिळवून दिली. ह्याच रॉकेटने चांद्रयान-1 (2008) आणि मंगळयान (2013) सारख्या ऐतिहासिक मोहिमा नेल्या.
PSLV चे प्रकार
PSLV-CA (Core Alone) – स्ट्रॅप-ऑन शिवाय हलके काम.
PSLV-Standard – 6 स्ट्रॅप-ऑनसह सामान्य आवृत्ती.
PSLV-XL – सर्वात शक्तिशाली, जड उपग्रहांसाठी.
GSLV आणि क्रायोजेनिक इंजिन : मानवयुक्त चांद्र मोहिम भारत 2040
भारताला जेव्हा जड उपग्रहांना उंच कक्षेत पाठवायचे होते, तेव्हा GSLV विकसित केले गेले. अमेरिकेने क्रायोजेनिक तंत्रज्ञान देण्यास नकार दिल्यामुळे भारताने स्वतःच द्रव हायड्रोजन व ऑक्सिजनवर चालणारे क्रायोजेनिक इंजिन बनवले.
2014 मध्ये हे यशस्वी झाले आणि मग GSLV Mk-III (LVM-3) तयार झाले. हे रॉकेट 4000 किलो वजन भूस्थिर कक्षेत घेऊन जाते. ह्याच रॉकेटने GSAT-19 (2017), चांद्रयान-2 (2019) आणि चांद्रयान-3 (2023) मोहिमा नेल्या.