सध्याच्या काळात सरकारी नोकरी मिळविणे म्हणजे कठीणच आहे. नोकरी मिळाली कि समाजात मान-मर्यादा मिळते. महाराष्ट्राचे लोक वैभव असणारी लावणी जरी सांस्कृतिक क्षेत्रामध्ये कितीही चांगल्या प्रकारे बघत असलो, तर समाजाचा दृष्टिकोन मात्र त्याकडे बघण्याचा हा तेवढा चांगला नाही. परंतु स्वतःच्या आवडीसाठी लावणी करणे, लावणीतून आई- वडिलांच्या आयुष्यासाठी अधिकारी होणे. असा थक्क प्रवास करणाऱ्या महाराष्ट्रातील एक यशस्वी पोलीस अधिकारी म्हणून सुरेखा कोरडे यांचा प्रवास समाजासाठी प्रेरणादायी आहे. (MPSC Success Story)
सुरेखा कोरडे यांना नृत्याची आवड होती. नृत्यामध्येचआपलं करिअर करावं असं त्यांना नेहमीच वाटायचं. पण घरची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे सातवीत असतानाच आईसोबत धुणीभांडी करायला त्या जाऊ लागल्या. अशाप्रकारे त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण झालं. त्यानंतर; “डान्सची प्रचंड आवड असल्याने मी छोट्या- मोठ्या सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घ्यायची, परंतु वडिलांचा माझ्या डान्सला कडकडून विरोध होता;” असं सुरेखा यांनी सांगितलं.
प्रसंगी धुणी-भांडी केली
सुरेखा कोरडे यांचं सुरुवातीचं शिक्षण हे औंधमधील कस्तुरबा गांधी वसाहत इथे झालं. आई-वडिलांची परिस्थिती जेमतेम होती. वडील पीएमटी ड्रायव्हर होते. तर आई धुणी – भांड्याची काम करत. घरात पाच मुली, घरची आर्थिक परिस्थिती तेवढी चांगली नव्हती. त्यावेळेस सुरेखा कोरडे यादेखील आईसोबत कामाला जायच्या. आपल्या वडिलांचं पहाटे उठून जाणं हे त्यांना सतत कुठेतरी मनाला दुःख देत होतं आणि आपण यांना हातभार लावावा अशा विचारातूनच, त्यांनी लावणीकडे छंद म्हणून पहिलं आणि हा छंद जोपासताना घराला हातभार लावण्यासाठी थोडे पैसे मिळतील या दृष्टिकोनातून पाहिलं आणि स्टेजवर लावणी करायला सुरुवात केली.
आपण नृत्याकडे कसे वळलो याची आठवण सांगताना सुरेखा कोरडे यांच्या डोळ्यासमोरून ते दिवस उभे राहतात. दहावीत असताना कराटेच्या स्पर्धेसाठी सुरेखा यांना काठमांडूला जायचं होतं. पण त्यासाठी 9 हजार रुपये फी भरायची होती. आता फी भरण्यासाठी तर पैसे नव्हते. मग त्यांना एका नृत्य स्पर्धेची जाहिरात कळाली. त्यांनी त्या स्पर्धेत भाग घेतला, फक्त सहभागच नाही तर त्या स्पर्धेत त्यांनी पहिला क्रमांक पटकावला. त्यावेळी 12 हजार रुपये बक्षीसाची रक्कम त्यांना मिळाली. याच रकमेतून त्यांनी काठमांडूच्या कराटे स्पर्धेत भाग घेतला आणि सिल्व्हर मेडल जिंकलं. आणि इथूनच सुरेखा कोरडे यांच्या नृत्याच्या करिअरला सुरवात झाली.
घरी पाच बहिणी आणि आई-वडील. आर्थिक परिस्थिती बेताचीच. सुरेखा यांना नृत्य करण्याचा छंद असल्यामुळे त्यांनी लावण्यखणी या लावणीच्या कार्यक्रमामध्ये लावणी करण्याचा निर्णय घेतला. परंतु आई-वडील आणि समाज लोक कलेकडे वाईट नजरेने बघत होता. त्यामुळे वडिलांचा सुरुवातीला खूप विरोध होता. त्यानंतर घरूनच विरोध असल्यामुळे समाजातले लोक खूप काही बोलायचे. पण आवड म्हणून त्यांनी वडिलांना न सांगता लावण्यखणीचे अनेक शो केले. त्यानंतर एक दिवशी वडिलांनी त्यांना अट घातली, की जर तु पुढचं शिक्षण घेतलं, तर आम्ही तुला लावणी करायला परवानगी देतो. लावणीच्या आवडीसाठीच त्यांनी पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं.
2010 एमपीएससीच्या मुख्य परीक्षा पास:
एका मर्यादा पलीकडे आपण लावणी कलाकार असो किंवा नसो, परंतु जर आपण एमपीएससी केलं तर अधिकारी म्हणून मात्र शेवटपर्यंत असू. या उद्देशाने आणि आई- वडिलांच्या मान समाजामध्ये मिळावा, समाजाने त्यांना हिणवू नये, या उद्देशाने तिने एमपीएससीची पूर्व परीक्षा दिली. 2010 एमपीएससीच्या मुख्य परीक्षेसाठी त्यांनी 2 महिने सदाशिव पेठमध्ये राहून अभ्यास केला. आणि त्यांची पहिली पोस्टिंग कळंबोली पोलीस स्टेशनला झाली. आज या गुन्हे अन्वेषण शाखेला एक यशस्वी अधिकारी म्हणून काम करता आहेत.