Fast Track Immigration Program India 2025 : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नुकतेच फास्ट ट्रॅक इमिग्रेशन – ट्रस्टेड ट्रॅव्हलर प्रोग्राम (FTI-TTP) या महत्वाकांक्षी योजनेचा विस्तार पाच नवीन विमानतळांवर केला आहे. यामध्ये लखनौ, तिरुवनंतपुरम, त्रिची, कोझिकोड आणि अमृतसर या विमानतळांचा समावेश आहे. त्यामुळे आता हा कार्यक्रम एकूण १३ विमानतळांवर कार्यरत झाला आहे.
या सुविधेमुळे प्रवाशांना लांबच लांब रांगेत उभे राहण्याची आवश्यकता उरणार नाही. फक्त ३० सेकंदांत इमिग्रेशन क्लिअरन्स पूर्ण होईल. प्रवाशांनी बोर्डिंग पास आणि पासपोर्ट ई-गेटवर स्कॅन करायचे, त्यानंतर बायोमेट्रिक पडताळणी होईल आणि ई-गेट आपोआप उघडेल.
अमित शहा यांनी सांगितले की, हा कार्यक्रम केवळ सोयीसाठी नाही तर भारतात घडत असलेल्या तांत्रिक परिवर्तनाचे प्रतीक आहे. हा कार्यक्रम पासपोर्ट आणि OCI कार्ड यांच्याशी जोडला गेला, तर प्रवाशांना वारंवार बोटांचे ठसे द्यावे लागणार नाहीत किंवा कागदपत्रे सादर करावी लागणार नाहीत. त्यामुळे भारतीय नागरिकांबरोबरच OCI कार्डधारकांनाही मोठा फायदा होईल.
हा प्रकल्प प्रथम 2024 मध्ये दिल्ली विमानतळावर सुरू झाला होता. नंतर मुंबई, चेन्नई, कोलकाता, बेंगळुरू, कोची आणि अहमदाबाद येथेही त्याचा विस्तार करण्यात आला. आता या पाच विमानतळांच्या समावेशामुळे एकूण १३ विमानतळांवर सुविधा उपलब्ध आहे. लवकरच नवी मुंबई आणि जेवर विमानतळांवर देखील ती सुरू होणार आहे.
आतापर्यंत सुमारे ३ लाख प्रवाशांनी नोंदणी केली असून त्यापैकी २.६५ लाख प्रवाशांनी या सेवेचा प्रत्यक्ष वापर केला आहे. अभिप्राय अत्यंत सकारात्मक आहे.
गेल्या दहा–अकरा वर्षांत आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतुकीत मोठी वाढ झाली आहे. २०१४ मध्ये परदेशात प्रवास करणाऱ्या भारतीयांची संख्या ३.५४ कोटी होती, ती २०२४ मध्ये ६.१२ कोटींवर गेली. त्याचप्रमाणे, भारतात येणाऱ्या परदेशी प्रवाशांची संख्या देखील वाढून १.५३ कोटींवरून जवळपास २ कोटींवर पोहोचली आहे.
यासाठी खास ftittp.mha.gov.in हे पोर्टल सुरू करण्यात आले आहे. इच्छुक प्रवाशांनी येथे नोंदणी करून कागदपत्रे अपलोड करायची आहेत. त्यांचे बायोमेट्रिक्स FRRO किंवा विमानतळावर घेतले जातील. त्यानंतर ते सहजपणे ई-गेट्सचा वापर करून जलद इमिग्रेशन करू शकतील.
Fast Track Immigration Program India 2025