एमपीएससी राज्यसेवा 2021 परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये प्रमोद चौगुले हा 633 मार्कांसह राज्यात पहिला आला आहे. प्रमोद चौगुले यांचा प्रवास तरुणाईसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे. आज जाणून घेऊयात, त्यांचा संघर्षमय आणि यशस्वी प्रवास.
विशेष म्हणजे मागच्या वर्षी जाहीर करण्यात आलेल्या निकालातही प्रमोद चौगुले हा महाराष्ट्रात प्रथम आला होता. यानंतर आता पुन्हा एकदा बाजी मारत दुसऱ्यांदा राज्यात पहिला क्रमांक पटकावत त्यांनी स्वत:ला सिद्ध केले.
प्रमोद हे मूळचे मिरज तालुक्यातील सोनी या गावचे आहेत. ते विवाहित असून त्यांना एक मुलगी देखील आहे. तसंच प्रमोद यांचे वडील टेम्पो चालक आहे तर आई टेलरिंगचं काम करते. “ते अनेक वर्षांपासून MPSC आणि UPSC ची तयारी करत आहे. मात्र, त्यांना यश मिळाले नव्हते. अखेर मागच्या वर्षी आणि आता पुन्हा एकदा त्यांनी एमपीएससी मध्ये बाजी मारत राज्यात प्रथम क्रमांक मिळवला.
प्रमोद यांचं प्राथमिक शिक्षण हे सोनी गावातच झालं. त्यानंतरचं शिक्षण घेण्यासाठी त्यांना नवोदय विद्यालयात प्रवेश मिळालं. यानंतर त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी मिळवली. मात्र, त्यांना आधीपासूनच MPSC आणि UPSC परीक्षांसाठी तयारी करण्याची इच्छा होती. म्हणून त्यांनी या स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याची सुरुवात केली. तसंच प्रमोद हे आपल्या पत्नीला आणि मुलीला सोडून पुण्यात MPSC च्या तयारीसाठी राहत होते.
सांगलीमध्ये आलेल्या पुरात प्रमोद यांचं संपूर्ण घर वाहून गेलं होतं. तसंच कोरोनाकाळात त्यांच्या कुटुंबाला कोरोनानं गाठलं होतं. मात्र, या कठीण परिस्थितीमधूनही मार्ग काढत प्रमोद यांनी MPSC परीक्षेत बाजी मारली. मागच्या वर्षीही त्यांचा पहिला क्रमांक आला होता. मात्र तेव्हा त्यांना हवी असलेली पोलीस उपअधीक्षक ही पोस्ट नसल्याने त्यांनी पुन्हा परीक्षा दिली आणि त्यांनी हे लक्षणीय यश मिळवलं. राज्यातील आणि देशातील अनेक तरुण तरुणींसाठी प्रमोद चौगुले यांचा प्रवास निश्चितच प्रेरणादायी आहे.