मुलगी शिकली प्रगती झाली असं वाक्य भरपूर वेळा ऐकायला मिळते. मात्र शिकून काय करायचं, घरचं तर सांभाळावं लागतं, हा मुलींकडे पाहण्याचा दृष्टीकोण आहे. पण आई-वडिलांसाठी तसेच समाजात काही करून दाखवायचं या जिद्दीच्या काही मुली देखील आपण पहिले असतील. याच एक उदाहरण म्हणजे जळगाव जिल्ह्यातील एका छोट्या खेड्यागावात राहणाऱ्या तरुणीने 2019 च्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात मुलींमध्ये द्वितीय क्रमांक मिळवून उपजिल्हाधिकारीपदी झेप घेतली. मानसी सुरेश पाटील असे उपजिल्हाधिकारी झालेल्या तरुणीचे नाव आहे.
नववी-दहावीत ठरवलं, प्रशासनातच जायचंय ही पोस्ट निघायच्या आधी मानसी पाटील या विक्रीकर निरीक्षक म्हणून कार्यरत होत्या. मानसी यांचे वडील निवृत्त प्राथमिक शिक्षक असून आई गृहिणी. आपल्या शिक्षणाविषयी सांगताना मानसी सांगतात, संपूर्ण शिक्षण जळगावातूनच पूर्ण झालं. दहावीला चांगले मार्क पडल्यानंतर डिप्लोमाला जाण्याचा निर्णय घेतला. जळगावमध्येच डिप्लोमी पूर्ण झाल्यानंतर बांभोरीच्या इंजिनिअरिंग कॉलेजमधून कॉम्प्यूटर इंजिनियरिंगमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. त्या सांगतात नववी-दहावीत मी ठरवलं होतं की, प्रशासनातच जायचंय. मात्र प्लान बी हाती असावा म्हणून इंजिनियरींग पूर्ण केलं.
आपल्या परीक्षेच्या तयारीविषयी त्या सांगतात, इंजिनियरिंग पूर्ण केल्यानंतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीला सुरुवात केली. छोट्या छोट्या परीक्षा द्यायला सुरुवात दिली. एसटीआय परीक्षा उत्तीर्ण झाले आणि नाशिक जीएसटी विभागात कार्यरत झाले. त्यानंतरही घरच्यांचा सपोर्ट होता. त्यामुळं परीक्षा देणं सुरुच होतं. शेवटचा प्रयत्न म्हणून राज्यसेवेची परीक्षा दिली आणि उपजिल्हाधिकारी पदी निवड झाली.
मोटिव्हेशनल स्पीच ऐका मात्र एका मर्यादेपर्यंत आपल्या यशाबद्दल बोलताना आणि अभ्यास करणाऱ्या तरुणांना संदेश देताना मानसी सांगतात की, तुम्ही ज्या क्षेत्रात आयुष्याचा पूर्ण प्रवास करणार आहात. त्या क्षेत्रात काम करताना तुम्हाला आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत समाधान मिळेल असं काम करावं. आयुष्याचं गणित कॅलक्युलेट करुन आपण निर्णय घ्यावा. आपला स्वभाव, वैचारिकता, प्रशासनाची डिमांड लक्षात घेऊन निर्णय घ्या. आपल्याला यशस्वी झालेला माणूस दिसतो मात्र त्याच्या मागचा संघर्ष आपल्याला दिसत नाही. त्यामुळं मोटिव्हेशनल स्पीच ऐका मात्र एका मर्यादेपर्यंत. ते आपल्याला प्रेरीत करतात. मात्र त्यासोबत अभ्यासाचं प्लानिंग आणि आपले प्रयत्न सर्वात महत्वाचं आहे.
राज्यसेवेच्या परीक्षेची तयारी परीक्षेच्या तयारीविषयी बोलताना मानसी पाटील सांगतात की, राज्यसेवा आणि कंबाईन परीक्षेची रचना वेगवेगळी आहे. मात्र या दोन्हींचा अभ्यास एकत्रित केला जाऊ शकतो. पण परीक्षेची डिमांड मात्र वेगवेगळी आहे. दोन्हीतला सिलॅबस बऱ्यापैकी कॉमन आहे. दोन्ही परीक्षेचे स्किल वेगळे आहेत. यासाठी जास्तीत जास्त जुन्या प्रश्नपत्रिकांचा सराव करणे. राज्यसेवेला वेळ जास्त मिळतो मात्र सिलॅबस देखील वाढतो. मी जवळपास सगळ्या परीक्षांचे फॉर्म भरले होते. राज्यसेवा माझं टार्गेट होतं. मात्र मी कंबाईनचा अभ्यास करत होते. कंबाईन परीक्षा आधी आल्यामुळं त्या फॉर्मुल्याने अभ्यास केला. राज्यसभेचा अभ्यास करताना मी फक्त वेगळ्या परीक्षांसाठी इनपुट्स दिले. आयोगाची प्रश्न विचारण्याची पद्धत जोवर आपण अवगत करत नाहीत तोवर आपली अॅक्युरसी वाढत नाही. टेक्स्ट सिरीज सोडवा. आयोगाच्या प्रश्नांवर जास्तीत जास्त भर द्या, असं त्या आवर्जून सांगतात.
मानसी सांगतात, आयुष्यात अडचणी सर्वांना येतातच मात्र आपण संयम, चिकाटी, अपार परिश्रमाने त्यावर मात करू शकतो व आपल्याला हवे ते नक्की मिळवू शकतो. यशाचा मार्ग खडतर असला तरी अशक्य कधीच नसतो, असंही त्या सांगतात.