कोल्हापूरच्या एका कन्येने MPSC मधून राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षेत ओबीसी महिलांमधून नुकताच संपूर्ण राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. रेश्मा बाजीराव ऱ्हाटोळ असे या मुलीचे नाव असून बिकट परिस्थितीवर मानत तिने फक्त आपल्या कुटुंबांची मान अभिनाने उंचावली आहे. तिच्या या यशामुळे सध्या गावासह जिल्हाभरात तिचे कौतुक होत आहे.
कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यात पुरेशा सोयीसुविधा नसलेलं जोगेवाडी हे गाव डोंगराळ भागात वसले आहे. या गावातील रेश्मा बाजीराव ऱ्हाटोळ या मुलीने आपल्या नावाचा ठसा स्पर्धा परीक्षेतून उमटवला आहे. रेश्माने जोगेवाडी गावातच तिचे १ ली ते ४ थी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण घेतले. तर ५ वी ते १० वी पर्यंतचे माध्यमिक शिक्षण तळाशी येथील शाळेत तिने पूर्ण केले. त्यानंतर बिद्री येथे १२वी पर्यंत शिक्षण घेऊन तिने मॅकॅनिकल या ब्रांचमधील डिप्लोमाची पदवी पॉलिटेक्निक कॉलेज, कोल्हापूर येथे प्राप्त केली. तर डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात तिने बी.ई. मेकॅनिकल ही इंजिनिअरिंगची पदवी घेतली. कॉलेजमध्ये शिक्षण घेत असतानाच रेश्माने एमपीएससी परीक्षेत आपलं नाव कमविण्याची जिद्द धरली होती.
बी.ई. नंतर तिने एमपीएससी परीक्षेसाठी पूर्ण वेळ दिला होता. पण काही परीक्षांमध्ये तिला अगदी थोडे मार्क्स मिळाल्यामुळे अपयश आले होते. तरी देखील खचून न जाता तिने अभ्यास सुरू ठेवला. आणि त्यातूनच आता राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षेत तिला घवघवीत यश प्राप्त झाले आहे.
रेश्माचे वडील बाजीराव ऱ्हाटोळ हे भोगावती साखर कारखान्यात हमालीचे काम करतात. रेश्माला आणि तिच्या भावांना संपूर्ण शिक्षण पूर्ण करू देताना वडिलांनी खूप कष्ट घेतले आहेत. पैशाची कोणतीही कमतरता न जाणवू देता त्यांनी रेश्माला सर्व बाजूंनी पाठिंबा दिला होता. त्यामुळे आता तिच्या यशाने त्यांची छाती अभिमानाने फुलून गेली आहे. हमाली करत असून देखील बाजीराव ऱ्हाटोळ यांनी एका मुलाला आयटीआय, तर दुसऱ्या मुलाला बीएस्सी पर्यंत शिकवले आहे. तर आता रेश्माने राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षेत ओबीसी महिलांमधून राज्यात प्रथम क्रमांक पटकावून बाजी मारली आहे. यामुळे तिचे कुटुंब आणि समाजात देखील विशेष कौतुक होत आहे.