महाराष्ट्रात तब्बल 2 लाख 44 हजार पदे रिक्त, कुठे किती रिक्त पदे?

मुंबई | नोकरी मिळविणे हे फारच कठीण झाले आहे. रोजगाराची स्वप्ने घेऊन वाटचाल करणाऱ्या तरुणांना पदभरतीची आशा आहे. परंतु पोलिस आणि तलाठी भरतीशिवाय कोणतीही भरती फारशी मोठी होत नसल्याची स्थिती गेल्या कित्येक वर्षांपासून आहे. मेगा नोकरभरतीची वाट पाहत काही पिढ्यांची वयोमर्यादाही संपत आली परंतु सर्वकष क्षेत्रातील मेगा पदभरती अजूनही ग्रहणातच आहे. त्यामुळे बेरोजगारीचे ग्रहण कधी सुटणार हाच यक्षप्रश्न आज सतावत आहे.

विविध विभागांमध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तब्बल 2 लाख 44 हजार पदे रिक्त असल्याची आकडेवारी एका माहिती अधिकारात उघड झाली. मे 2022 ची ही आकडेवारी असून प्रत्यक्षात नोकर भरतीत काटकसर चालू आहे. पण महत्वाचे उद्योग महाराष्ट्रातून गेले पर्यायाने रोजगारही गेले. नेमके हेच अपयश झाकण्यासाठी विद्यमान सरकार नोकर भरतीची नियुक्तीपत्रे जाहीर कार्यक्रम, समारंभ घेऊन देत असून हे दिखाऊपणाचे लक्षण असून सरकारचे दावे पोकळ असल्याची टीका होत आहे.

गृहविभागात जास्त रिक्त पदे:-
गृह विभागात सर्वात अधिक रिक्त पदे असल्याचे दिसते. विविध शासकीय विभागांत अपुरे मनुष्यबळ असल्यामुळे त्याचा अतिरिक्त कामाचा ताण अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांवर पडतो.

प्राप्त माहितीनुसार, कुठे किती रिक्त पदे?
राज्य सरकारच्या प्रशासनातील एकूण 29 शासकीय विभाग जिल्हा परिषद आस्थापनात मंजूर पदांची संख्या 10 लाख 70 हजार 840 इतकी. यापैकी आठ लाख 26 हजार 435 पदे भरलेली आहेत. तर दोन लाख 44 हजार 405 पदे रिक्त आहेत.

23 टक्के जागा रिक्त:-
मे 2022 रोजी एका माहिती अधिकारातून मागवण्यात आलेल्या प्रश्नांवर सामान्य प्रशासन विभागाने उत्तर दिले आहे. राज्यात शासकीय कर्मचारी यांची दोन लाख 44 हजार 405 जागा रिक्त आहेत. एकूण पदसंख्येच्या 23 टक्के जागा रिक्त आहेत. त्यामुळे 75 हजार नोकर भरती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात 75 हजार पदांच्या भरती प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश मंगळवारी मंत्रीमंडळ बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. पदभरती संदर्भात 14 विभागांचे सादरीकरण करण्यात आले. रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया गतिमान करण्याच्या दृष्टीने मंत्रीमंडळाने 14 विभागांचा सखोल आढावा घेऊन सूचना दिल्या. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यभरातील लिपिक टंकलेखक या पदासाठी भरती होणार आहे. या संदर्भातील जाहिरात जानेवारी 2023 मध्ये पहिल्या आठवड्यात प्रसिद्ध होईल.

अलीकडे झालेल्या पदभरतीच्या घोषणा
1. आता गृहविभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, जलसंपदा विभाग, महसूल व वन विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, आदिवासी विभाग, सामाजिक न्याय विभाग या जागांसाठी लवकरच भरती निघणार आहे. सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे शासनाच्या 29 विभागातील 75,000 पदभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकारने या संदर्भातला शासकीय आदेश जारी केला आहे.
2. राज्य सरकारने पोलिस दलातील 18 हजार 331 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. पोलिस भरतीसाठी आतापर्यंत 11 लाख 80 हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. या भरतीतून पोलिस शिपाई, राज्य राखीव पोलिस आणि वाहनचालक ही पदे भरली जाणार आहेत.
3. येत्या काही दिवसांमध्ये तलाठी भरती आणि मंडळ अधिकारी पदोन्नती प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. 3 हजार 110 तलाठी आणि 518 मंडळ‍ अधिकारी असे एकूण 3 हजार 628 पदे निर्माण करण्यात येणार असल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी सांगितले. त्यामुळे सरकारी क्षेत्रात तलाठी पोलिस भरती आणि छोट्या- छोट्या भरतीवरच तरुणांना अवलंबुन राहावे लागणार आहे.

 

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,925FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles